वाई | व्याजवाडी (ता. वाई) येथील एका गुटखा व्यावसायिकाने स्वत:च्या रहात्या घराच्या पडवीमध्ये चोरुन गुटखा ठेवून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यातून आणला होता. वाई पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर महिलांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी खाकी दाखवताच मार्ग मोकळा झाला अन् या छाप्यात 11 गुटख्याची पोती जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्याजवाडी येथील ऋषीकेश हणमंत पिसाळ याने स्वत:च्या रहात्या घराच्या पडवीमध्ये चोरुन गुटखा ठेवून चढ्या दराने विक्री करण्याच्या उद्देशाने कर्नाटक राज्यातून आणला होता. तब्बल 1 लाख 10 हजार रुपयांचा हा गुटखा आणून त्याचा साठा केला असल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत मिळताच त्यांनी वाई पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार विजय शिर्के, महिला पोलिस नाईक सोनाली माने, पोलिस कॉस्टेबल किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमीत गोळे, प्रसाद दुदुस्कर यांच्या पथकाला पाचारण केले व गुटख्याच्या साठ्यावर तात्काळ छापा टाकण्याचे आदेश दिले.
तातडीने व्याजवाडी (ता. वाई) येथील ऋषीकेश हणमंत पिसाळ याच्या घरावर डिबी पथकातील पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. पण गुटखा ठेवलेल्या घरातील पडवीपर्यंत हे पोलिस पथक पोहचू नये यासाठी आरोपीच्या घरातील महिला वर्गाने गोंधळ घालून पोलिसांना हुसकावून लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण डिबी पथकाने न डगमगता गोंधळ घालणाऱ्या महिलांना कायदा समजावून सांगितला, अन्यथा कारवाईचा मार्ग मोकळा असल्याचे सांगितले.
गुटख्याचा साठा ठेवलेल्या घरातील पडवीत प्लास्टिकच्या पोत्याखाली तब्बल 11 पोती गुटखा लपवून ठेवलेला बाहेर काढुन रितसर पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यात घेतला. या गुटख्याची आजच्या बाजार भावा प्रमाणे 1 लाख 10 हजार रुपये किंमत असल्याची माहिती विजय शिर्के यांनी दिली. आरोपी ऋषीकेश हणमंत पिसाळ यास पथकाने वाई सातारा रस्त्यावरील बावधन ओढा येथे ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणले. अधिक तपास सहायक फौजदार विजय शिर्के करत आहेत.