हा तर नामांतराचे राजकारण करणाऱ्यांचा ढोंगीपणा ; बाळासाहेब थोरातांची शिवसेना – भाजपवर सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेस मध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवरच टीकेचा बाण सोडला आहे. आणि भाजपला देखील खडेबोल सुनावलं आहे. मागील 5 वर्षे सत्तेत असूनही औरंगाबाद नामांतरावर गप्प असणारा भाजप आज त्यावर राजकारण करत आहे. हा भाजपचा ढोंगीपणाचा असल्याचा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केलाय. तसेच शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा ‘सामना’ सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?,” असा सवाल थोरात यांनी शिवसेना-भाजपाला केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे,” असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. तसेच औरंगाबादच्या नामांतर प्रकरणावरुन असलेल्या मतभेदांमुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होणार नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलंय. तसेच कुणालाही यामुळे उकळ्या फुटण्याचं कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment