काँग्रेसचा मोठा निर्णय : पक्षातील सदस्यातील एका कुटुंबाला एकच तिकीट देणार

Congress chintan shibir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात भाजपकडून निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केल्यानंतर काँग्रेसकडून रणनीती आखली जाऊ लागली आहे. या दरम्यान काँग्रेसच्या सर्वच दिग्गज नेत्यांसाठी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एक महत्वाचा आणि मोठा निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे काँग्रेस आता एका कुटुंबाला निवडणुकीचे एकच तिकीट देणार आहे.

काँग्रेसच्या वतीने आज चिंतन शिबीर घेण्यात आले. या शिबिरात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “देशात अशी कुठली दुसरी पार्टी आहे जी देशात अशाप्रकारे चर्चा करते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा संवादाला कधीच संधी देणार नाही.

दलित म्हणून भाजप संधी देत नव्हती हे आर्या यांनी मला सांगितले आहे. काँग्रेससारखा असा दुसरा पक्ष नाही ज्यामध्ये भीती शिवाय बोलता येते. जनतेसोबत चर्चा की जनतेसोबत हिंसा? यामध्ये निवडण्याची वेळ आली आहे. संसदेमध्ये जे होत आहे ते आपण पाहत आहोत. न्याय पालिका दबावात आहे, असे गांधी यांनी म्हंटले.

चिंतन शिबिरात घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय –

1) काँग्रेस संघटनेत एकाच पदावर एक टर्म (5 वर्षे) पूर्ण केल्यानंतर पुन्हा लगेच संधी मिळणार नाही. 3 वर्षांनंतर या पदावर पुन्हा नियुक्ती करता येईल.

2) प्रत्येक राज्यात राजकीय व्यवहार समिती असेल.

3) शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल.

4) MSP हमी कायदा करेल. एमएसपीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांची पिके खरेदी करता येणार नाहीत.

5) संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जातील.

6) CWC मध्ये एक उपसमिती देखील स्थापन केली जाईल, जी सर्व प्रकरणांवर काँग्रेस अध्यक्षांना मत देईल.

7) एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल, दुसर्‍या सदस्याने पक्षाला 5 वर्षे दिली असतील, म्हणजे पक्षासाठी सक्रिय काम केले असेल तरच तिकीट मिळेल.

8) काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी समिती स्थापन केली जाईल, ज्याचे सदस्य CWC मधून घेतले जातील.

9) संघटना, ओबीसी/एससी/एसटी महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल.

10) शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाईल.

11) वीजबिल माफ आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली जाईल.

12) देशातील अंतर्गत निवडणुका आणि निवडणुकांसाठी पक्षात कायमस्वरूपी विभाग तयार करण्यात येणार आहे.

13) आम्ही सत्तेत आल्यास ईव्हीएमवर बंदी घालू आणि पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेऊ.