संसदेत भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली; अशोक चव्हाणांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा व राज्यसभेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या खासदारांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडत बाजू लावून धरली. मात्र, भाजपचे खासदार आरक्षणाबाबत न बोलल्यामुळे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. संसदेत भाजपच्या खासदारांनी आरक्षणाबाबत वाच्यता न केल्यामुळे आता खऱ्या अर्थाने भाजपची दुतोंडी भूमिका उघड झाली असल्याची टीका चव्हाण यांनी यावेळी केली.

काँग्रेसचे नेते तथा मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व्यवस्थित वाचला पाहिजे. 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याची मागणी ही सबब नाही. याच आरक्षण मर्यादेमुळे मराठा आरक्षण फेटाळले गेले, ही वस्तुस्थिती आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत चव्हाण म्हणाले की, संसदेत राज्यांचे मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार पुन्हा बहाल केले जात असताना त्याचवेळी ही मर्यादा देखील शिथिल करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली होती. त्यानंतर आता लोकसभा व राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले.