‘गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभारही तुम्ही सांभाळता, तेथील मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं का?’- बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)यांनी लिहिलेल्या पत्रावरून निर्माण झालेल्या वाद मिटताना दिसत नाही आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत (balasaheb thorat) यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,” असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली, तर मंदिरं बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का? राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?,” असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.

‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठामपणे उत्तर दिलं. ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का? माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,” असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment