भोपाळ । अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. दरम्यान, संपूर्ण देशावर कोरोना महामारीचं संकट असून अशा वेळी हा सोहळा होत आहे. या कारणावरून विरोधक पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टि्वटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिर निर्माण भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
दिग्विजय सिंह यांनी लागोपाठ केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आता तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय?”. भूमिपूजनासाठी निवडलेल्या अशुभ मुहुर्तामुळेच या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांना कोरोना व्हायरसची लागण होतेय असं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.
”माझी मोदीजींना विनंती आहे, त्यांनी ऑगस्टचा अशुभ मुहुर्त टाळावा, शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माणाचा योग आला आहे, त्यामुळं आपल्या हट्टापायी त्यात विघ्नं पडू देऊ नका,” असे दिग्विजय यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. भगवान राम कोट्यवधी हिंदुंच्या आस्थेचे केंद्र आहे. हजारो वर्षांपासून धर्माच्या स्थापित मान्यतांबरोबर खेळू नका असा दिग्विजय सिंह यांनी सल्ला दिला आहे
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”