दिल्ली । काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) करावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात राऊत यांनी दोनदा त्यांच्या लेखांमधून पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावरून काँग्रेसनं नाराजीदेखील व्यक्त केली. याच दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी यावर भाष्य केलं आहे.
पी चिदंबरम यांनी शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नसल्याचं म्हटलं आहे. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची यूपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. “शरद पवार यांचीही यूपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. आम्ही पंतप्रधानांची निवड नाही करत आहोत” असं देखील पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एका बाजूला संजय राऊत यांच्याकडून जोरदार बॅटिंग सुरू असताना आता खुद्द शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे. ‘यूपीएचा अध्यक्ष होण्यात मला कोणताही रस नाही. माझ्या नावावरून अनावश्यक वाद निर्माण केला जाऊ नये. मी यूपीएचं अध्यक्ष व्हावं, हे शिवसेनेचं मत आहे. माझं नाही,’ असं पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’