कॉंग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा प्रसार माध्यम कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनीही काँग्रेसच्या प्रसार माध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र दर्डा सलग १५ वर्षे आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदेही भूषवली आहेत.

ते दैनिक ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे मालकदेखील आहेत. राजेंद्र दर्डा यांनी प्रसारमाध्यम आणि संपर्क या कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेससमोरील समस्या आणखी वाढली आहे. वैयक्तिक अडचण असल्यामुळे आपण या कमिटीतून बाहेर पडत असल्याचं राजेंद्र दर्डा यांनी सांगितलं आहे. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

राजेंद्र दर्डा विधानसभा निवडणूक लढवणार का नाही हा देखील महत्वाचा प्रश्न या राजीनाम्याने उपस्थित केला आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. आता त्या विधानसभा मतदारसंघात एमआयएम तगडा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राजेंद्र दर्डा विधानसभा निवडणूक लढणार का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.