हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवरून शिवसेनेने देखील सामना अग्रलेखातून काँग्रेस वर पलटवार केला होता. दरम्यान, काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला मिरच्या का झोंबतात? असा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
निरुपम म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एकला चलो रे या घोषणेवर मी सहमत आहे. कॉँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. जर काँग्रेस स्वबळावर लढत असेल, तशी इच्छा असेल तर शिवसेनेला, किंवा त्यांच्या प्रक्षप्रमुखांना मिरची झोंबायचे कारण नाही, असं संजय निरुपम म्हणाले.
शिवसेनेने नक्की काय म्हणल-
काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेवर शिवसेनेने टीका केली होती. स्वबळाचे दांडपट्टे यापूर्वी देखील फिरवले गेले. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे असा टोला देखील शिवसेनेने काँग्रेसला लगावला.