हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल निवडणूक चर्चेत असून ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे. काहीही करून बंगाल चा गड काबीज करायचाच यासाठी भाजप कडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणेच लढा देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ममतांच्या मदतीला धावून जाणार आहेत. शरद पवारांचे नाव हे तृणमूलच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सामिल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहेत.
यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करू नका, असे आवाहन त्यांनी केलंय. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणे टाळा असे ते म्हणालेत.
देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे केवळ बंगालमध्ये पवार यांना काँग्रेसविरोधात म्हणजेच ममतांच्या बाजूने भूमिका घ्यावी लागणार आहे. जेणेकरून काँग्रेसचे मतदार संभ्रमित होऊ शकतात अशी भीती काँग्रेसला आहे. त्या अनुषंगाने भट्टाचार्य यांनी पत्र लिहिले आहे.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकासआघाडीचा भाग आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा विरोधक असणाऱ्या तृणमूलच्या प्रचारास गेल्यास ही बाब काँग्रेस नेत्यांना खटकू शकते.