व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे. रविवारी रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने एअरऍम्ब्युलन्सने त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल.

यापूर्वी धानोरकर यांची किडनीस्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच स्थूलतेची शस्त्रक्रियादेखील धानोरकर यांच्यावर झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते.

काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४७ होते. खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होईल.