ग्रामीण लोकांसोबत शेफ राहुल गांधींनी बनवली मशरुम बिर्याणी; व्हिडिओ व्हायरल

पद्दुचेरी । ‘व्हिलेज कुकिंग चॅनल’ नावाच्या यूट्यूब चॅनलसोबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मशरुम बिर्याणी बनवण्याचा आणि त्याचा जमिनीवर बसून आस्वाद घेण्याचा अनुभव घेतलाय. त्यांच्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. २० जानेवारी रोजी अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.

तामिळनाडूच्या एका गावात स्थानिक रहिवाशी आणि कुकिंग टीमसोबत बिर्याणी बनवण्यासाठी मदत करताना राहुल गांधी या व्हिडिओत दिसत आहेत. सोबतच बिर्याणीसाठी वापरण्यात आलेल्या पदार्थांची तामिळ भाषेतील नावंही राहुल गांधी उच्चारताना दिसत आहेत. स्थानिक आणि राहुल गांधी यांच्यात भाषेची देवाण-घेवाण व्हावी यासाठी एक महिला दुभाषी म्हणून काम करताना या व्हिडिओत दिसत आहेत. आपल्याला जेवण बनवण्याची आवड असल्याचंही राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटलंय.

‘हा आमच्यासाठी मोठा दिवस आहे. राहुल गांधींनी आमची कुकिंग पाहिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. आज आम्ही परंपरागत रेसिपीसोबत मशरुम बिर्याण बनवली. राहुल गांधी यांनीही मशरुम बिर्याणीचा आनंद घेतला. हा क्षण आम्ही कधीही विसरणार नाही. ही संधी देण्यासाठी खूप खूप धन्यवाद राहुल गांधी सर’ असं हा व्हिडिओ पोस्ट करताना यूट्यूब चॅनलच्या सदस्यांनी म्हटलंय.

यूएस ट्रीपसाठी मदतीचं दिलं आश्वासन
भारतानंतर आता परदेशात जाऊनही कुकिंग करण्याचं आपलं स्वप्न असल्याचं कुकिंग टीमनं राहुल गांधींसमोर म्हटलं. यावेळी, राहुल गांधींनी ‘सर्वात अगोदर तुम्ही कोणत्या देशात जाऊ इच्छिता?’ असं त्यांना विचारलं असता ‘यूएसए’ असं उत्तर त्यांनी दिलं. तेव्हा, ‘यूएसमध्ये माझे मित्र सॅम पित्रोडा आहेत. मी त्यांना सांगून तुमची यूएस ट्रीप आखण्यात मदत करेन’ असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like