हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजप नेत्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून त्याना नक्की का ताब्यात घेतले असा उलट प्रश्न पोलिसांना केलं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खासगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली? केंद्रीय मंत्र्यांने भाजपा आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे.
महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
आज राज्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर जे घाणेरडे राजकारण करत आहे ते निषेधार्ह आहे. रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कोटींचा रेमडेसिवीरचा साठा कुठून आला ? याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भानगडीत जनता भरडली जाणार नाही याची खबरदारी घेऊन या संकटात आपण जनतेला सर्व प्रकरणाची आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी आणि कोरोनाच्या या महामारीत जनतेचे जीव वाचवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करावेत असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे