हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस असून राहुल गांधींच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून देशाच्या इतिहासात नरेंद्र मोदींची नोंद होईल, अशी टीकाही त्यांनी केली.
कोरोनाचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून खा. राहुलजी गांधी सातत्याने केंद्र सरकारला आर्थिक पातळीवर होऊ शकणारे नुकसान तसेच वैद्यकीय क्षेत्रात करावयाच्या उपाययोजनांवर सूचना करत असताना देशाचे पंतप्रधान मात्र जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवायला आणि दिवे लावायला सांगत होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला गंभीर परिणामाचा इशारा दिला होता आज एक वर्षानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. नोटाबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली जीएसटीची अंमलबजावणी, कोणतीही पूर्वसूचना न देता व नियोजन न करता अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ऐतिहासिक रसातळाला गेली.
लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरिबांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची सूचना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले गेले त्याची फळं देशातील गरीब जनता भोगते आहे.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जगभरात उपलब्ध असणाऱ्या लसींना परवानगी देऊन देशातील लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना राहुल गांधी यांनी केली होती. त्यावेळी राहुल गांधी औषध कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याचा पोरकट आरोप केला आणि नंतर चार दिवसातच केंद्र सरकारने परदेशी लसींना परवानगी दिली. कोरोना लसीकरणासाठी वयाची अट शिथील करून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची मागणी आम्ही केली आहे. सरकारने त्यावर गांभीर्यांने विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.