मुंबई प्रतिनिधी । राज्यात सत्तास्थापनेवरून अजूनही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामध्ये एकमत होताना दिसत नाही आहे. आज शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा योग्य दिशेनं चालू आहे असे सांगितलं आहे. मात्र काँग्रेस अजून सत्तेत सहभागी होण्यावरून संभ्रमावस्थेत आहे असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. याबाबत नवाब मलिक यांनी सूचक विधान केलं आहे.
‘केवळ सरकार स्थापन कारणं महत्वाचे नाही आहे तर सरकार चालवणं सर्वात जास्त महत्वाचे असं शरद पवार यांचे म्हणणं आहे. तेव्हा सर्वात प्रथम काँग्रेसनं ठरवावं कि सरकारमध्ये सहभागी व्हावं कि नाही. सुरुवातीला शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार नव्हती. नंतर काँग्रेसचे तरुण आमदार आणि काही नेत्यांची शिवसेसोबत सरकारमध्ये सामील व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसन कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आखण्याची अट ठेवली. त्यानुसार आम्ही काम केलं. तेव्हा सरकार बनविण्याबाबत काँग्रेस सहमत होईल’ असा आशावाद नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
तसेच उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहोत. राज्यात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. शेतकरी अडचणीत असल्याने लवकरात लवकर राज्यपालांनी त्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही उद्या राज्यपाल यांना करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.