हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ (INDIA)ने बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. मात्र राष्ट्रीय काँग्रेसने (Congress) पक्षातील जागा वाटपासाठी ‘नॅशनल अलायंस कमिटी’ स्थापन केली आहे. कॉंग्रेसच्या या कमिटीची मॅरथॉन बैठक नुकतीच म्हणजे 29, 30 डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत विविध राज्यांची जबाबदारी काही नेत्यांवर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. इंडिया आघाडीतील सामील 28 राजकीय पक्षांमधील लोकसभा निवडणुकीचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला नसला तरी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.
देशातील विरोधी पक्षांची’ इंडिया’ आघाडी स्थापन झाली आहे खरी, परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद आहेत. विविध राज्यांतील जागावाटपांवरून या पक्षांत स्पर्धा सुरु झाली आहे. कॉंग्रेसबाबत बोलायचे झाले तर महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या सहकारी पक्षांनी आपापल्या जागांवर दावा केला आहे. कॉंग्रेसने जास्त जागा सहकारी पक्षांना सोडण्याची मागणी सहकारी पक्षांतून होत असल्याने कॉंग्रेस हवालदिल झाली आहे. लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्मुल्यावर मुदत संपल्यानंतरही निर्णय झालेला नाही. आता कॉंग्रेसने 4 जानेवारी रोजी जागा वाटप निश्चित करण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावर बैठक बोलावल्याचे समजते. कॉंग्रेसच्या ‘नॅशनल अलायंस कमिटी’ ने विविध राज्यांतील प्रमुख नेत्यांची भेटही घेतली होती. लोकसभा निवडणुकीत उतरण्यासाठी कॉंग्रेसने 290 जागांवर दावा केला आहे.
कॉंग्रेसने गत 2 लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेत 290 संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. तसेच 2019 मध्ये पक्षाला किती जागांवर विजय मिळाला व दुसऱ्या क्रमांकावर किती उमेदवार होते, याची माहिती गोळा करून कॉंग्रेसने हा विचार केला आहे. जागावाटपाबाबत कॉंग्रेस श्रेष्ठींनी 11 राज्यांतील प्रमुख नेत्यांची बैठक घेतल्याचे म्हटले जात आहे. याद्वारे कॉंग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी 290 जागांची मागणी केली आहे.
अशी केली कॉंग्रेसने राज्यनिहाय जागांची मागणी
जम्मू-काश्मीर – 2, लडाख – 1, पंजाब – 6, चंदीगड – 1, हिमाचल प्रदेश – 4, हरियाणा – 10, दिल्ली – 3, राजस्थान – 25,मध्य प्रदेश – 29, छत्तीसगड – 11, उत्तर प्रदेश – 20, उत्तराखंड – 5, बिहार – 8, गुजरात – 26, ओडिशा – 21, पश्चिम बंगाल – 6 ते 10, आंध्र प्रदेश – 25, तेलंगणा – 17, कर्नाटक – 28, महाराष्ट्र – 18 , तामिळनाडू – 8, केरळ – 16, गोवा – 2, झारखंड – 7 आणि ईशान्येकडील राज्ये – 25 अशा कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या राज्यनिहाय जागा आहेत. इंडिया आघाडीतील 28 पक्षांशी सर्वकष चर्चा करून कॉंग्रेस लोकसभेच्या निवडणुकीचा जागावाटप फॉर्म्यूला निश्चित करणार आहे.
लोकसभेसाठी एकूण 543 जागा असून गत लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने 351 जागा तर काँग्रेसप्रणीत युपीएने 90 जागा जिंकल्या होत्या. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला जास्त जागांवर उभे राहण्यास इंडियातील सहकारी पक्षांचा विरोध होत आहे. तसेच 10 राज्यांत कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे कॉंग्रेस स्वबळावर निवडणुकांचा पर्याय शोधणार का हे पहावे लागेल.