नवी दिल्ली : देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. देशातील काँग्रेस शासित राज्यांसाह देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10.30 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकी करिता महाराष्ट्रातून काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, बाळासाहेब थोरात राज्यामधील कोरोना परिस्थिती आणि लसीचा मुद्दा बैठकीत मांडतील अशी माहिती आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने ज्या प्रकारच्या जाणीव-जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचे नियोजन या बैठकीत बाळासाहेब थोरात मांडण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना प्रकोपाच्या दरम्यान काँग्रेस सेवा दल आणि युवक काँग्रेसच्या वतीने सहाय्यता कार्यक्रम राबवण्यात येईल अशी माहिती असून या बैठकीत यावरील देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने मदत केंद्र उभारण्यात येईल आणि देशातील कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी काँग्रेस कडून कशी मदत करता येईल यावर एक रोड मॅप ठरवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page