हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात राजकिय नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.
भाजपच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. याचा राजकीय फटका आपल्याला बसू नये म्हणून वारंवार खोटे बोलून आपल्या पापाची जबाबदारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेते करत आहेत.
महाराष्ट्रातील 21 पेक्षा जास्त जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असताना मराठा आरक्षणासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा. अन्यथा वेळ जाईल असे म्हणून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला. तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजी राजेंवर दबाव टाकण्याचे पाप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.