मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीमुळे महाविकासआघाडीत नाराजीनाट्य अजूनही सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीत नाराजी असल्याचे वृत्त फेटाळून लावले. महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी अधिक भक्कम होईल. सर्व कामे नीट पार पडतील, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
सरकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभाजनाचा प्रस्ताव परस्पर तयार केल्यामुळे अशोक चव्हाण नाराज झाले होते. मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याची नाराजी चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन बोलून दाखवली होती. त्यामुळे महाविकासआघाडीत नवे नाराजीनाट्य सुरु झाले, अशी चर्चा होती. मात्र, आज बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेत याप्रकरणावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले कि, ”मी अशोक चव्हाण यांना भेटलो, यामध्ये काहीही नवीन नाही. आमच्या भेटी होतच असतात. तसेच अशोक चव्हाण यांच्या खातेविभाजनचा निर्णय एकमताने घेतला जाईल,” असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”