हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. याचे पडसाद अमरावतीत उमटले याठिकाणी घडलेल्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात ज्यावेळी निवडणुका असतात, तेव्हा-तेव्हा भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जाते. त्रिपुरा प्रकरण देखील त्याचाच एक भाग आहे. ही भाजपाची जुनी सवय आहे,” अशी टीका पटोले यांनी केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, त्रिपुरातील घटनेवरून आता भाजपकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. त्रिपुरामध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही, या सर्व अफवा आहेत. कोणीही अफवांना बळी पडू नका. मालमत्तेचे नुकसान करू नका, असे आवाहनही यावेळी पटोले यांनी केले.
यावेळी पटोले यांनी महागाईवरून भाजपवर हल्लाबोल केला. वाढत्या महागाईला मोदी सरकारची धोरणे जबाबदार असून, याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय, सविधान धोक्यात आले आहे. याचा जाब काँग्रेस विचारल्याशिवाय राहणार नाही. भाजपाकडून सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद एक दिवसही टिकवता आले नाही, याचा त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे ते सातत्याने सरकार अस्थिर कसे होईल याचा विचार करत आहेत, असा टोला फडणवीस यांना पटोले यांनी लगावला.