हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना परिस्थिती भीषण होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहे. ८ दिवस कि १४ दिवसाचे लॉकडाऊन करायचे हा निर्णय आज होणार आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध आणि कडक वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. या वीकेंड लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. आता तळीरामांसाठी असाच एक निंय घेण्यात आला आहे. तो म्हणजे त्यांना आता घरपोच दारू दिली जाणार आहे.
लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीही बंद करण्यात आल्यामुळे मद्यप्रेमींची खूप निराशा झाली आहे. आता कधी लॉकडाऊन उठणार आणि आपल्या कोरड्या घशाला ओलावा कधी मिळणार याची चिंता त्यांना लागून राहिली असताना मुंबई महापालिकेने नुकतेच मद्यविक्रीबाबत महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. मुंबईत परवानाधारक मद्य विक्रेत्यास घरपोच परवानाधारक खरेदीदारास मद्य विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार परवानाधारक दुकानदार मद्यविक्री सकाळी 7 ते रात्री 8 पर्यत होम डीलव्हरी करु शकेल. तसेच कुणालाही थेट दुकानात जाऊन मद्य विकत घेता येणार नाही. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
आदेशात नेमकं काय म्हटलं आहे?
1) परवानाधारक मद्यविक्रीता भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरिट्स, बीअर, सौम्य मद्य, वाईन या मद्य प्रकाराची विक्री परवानधारक खरेदीदाराच्या निवासी पत्यावर घरपोच विक्री करु शकतो.
2) मद्यविक्रीची वेळ ही सकाळी सात ते रात्री आठ अशी असेल. ज्या भागात मद्यविक्रीचे दुकान आहे त्याच परिसरात होम डिलिव्हरी करता येईल. कुणालाही थेट दुकानात जाऊन मद्य विकत घेता येणार नाही.
3) मद्य विक्रीकरता घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक केली जाईल, त्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँन्ड सॅनिटायझरचा वापर करावा.
4) राज्य सरकारने लागू केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि ब्रेक द चेन अंतर्गतचे आदेश असेपर्यंत हे नियम लागू राहतील.
5) प्रतिबंधित क्षेत्रामध्ये यापूर्वी वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व निर्बंध लागू राहतील. तसेच शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व कार्यालय, अत्यावश्यक सेवेतील दुाकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहील.
6) तसेच संबंधित आदेशांचे पालन केले नाही तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.