नवी दिल्ली । जगातील इतर देशात कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची गरज असल्याचं, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात ICMRचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगतिलं आहे. लंडन आणि जगातील इतर शहरांमध्ये रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिल्ली, तसंच संपूर्ण भारतातच मोठी लोकसंख्या असल्याने अशा परिस्थितीत खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं बलराम भार्गव यांनी म्हटलं
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत होती. परंतु अचानक ही संख्या हळू-हळू कमी होऊ लागली. आता गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असली, तरी दुसरीकडे मात्र रुग्णांचा बरे होण्याचा रिकव्हरी रेट त्याहूनही वेगात वाढत असल्याची चांगली बाब असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात 3 कोटी 60 लाखहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या 31 लाखांवर गेली असून 24 लाखहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 58 हजार 390 जणांचा मृत्यू झाला आहे. जो संसर्गग्रस्तांच्या एकूण लोकांपैकी केवळ 1.84 टक्के आहे. देशात एकूण संसर्गग्रस्तांपैकी 2.70 टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. तर 1.92 टक्के आयसीयूमध्ये आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये 69 टक्के पुरुष आणि 31 टक्के महिला आहेत. वयानुसार, 17 वर्षांखालील 1 टक्के, 18 ते 25 वर्ष 1 टक्के, 26 ते 44 वर्ष 11 टक्के, 45 ते 60 वर्ष 36 टक्के आणि 60 वर्षांवरील 51 टक्के लोक आहेत.
कोरोना लसीबाबत रशियासोबत सरकार संपर्कात असून मिळालेल्या माहितीनुसार, ती प्रायमरी लेवलवर आहे. भारतात सध्या तीन वॅक्सिन क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. सीरम इंस्टिट्यूट Serum Institute वॅक्सिन फेज 3 मध्ये असून यात 1700 लोकांचे सॅम्पल साईज आहेत, अशी माहितीही भार्गव यांनी दिली. भारत बायोटेकने Bharat Biotech फेज 1 मध्ये 375 लोकांचे सॅम्पल घेतले होते. आता फेज 2 सुरु होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जायड्स कॅडिला Zydus Cadila वॅक्सिन फेज 1, सॅम्पल 50चं होतं. त्याचीही फेज 2 सुरु होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”