हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या भीतीने एसटीच्या सांगली विभागाच्या १२ तर सांगली आगारातून पुण्याला जाणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरु आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी गर्दी होणारे कार्यक्रम थांबवण्याचे आवाहन केले आहे. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी सांगली विभागाच्या पुणे मार्गावर धावणाऱ्या बसच्या १२ फेऱ्या रद्द केल्या आहेत. सांगली आगारातून पुण्याला प्रत्येक अर्ध्या तासाला बस फेऱ्या सोडण्यात येतात. सांगली आगारातून ६ फेऱ्या रद्द केल्याने २ हजार ७२७ किलोमीटर अंतर धावण्याचे थांबले आहे. सांगलीतून दररोज १६ फेऱ्या सोडल्या जातात. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या भीतीपोटी २ दिवसापूर्वी संपूर्ण सांगली बस स्थानकावर औषध फवारणी करून घेण्यात आली होती. कोरोनाबाबत सर्वत्र मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जात आहे. दरम्यान सांगली ते कोल्हापूर, इचलकरंजी आणि सातारा या मार्गावरील एसटी बसेसच्या १५ फेऱ्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी अनेक प्रवाशांनी परगावी जाण्याचे टाळले आहे. प्रवाशांची गर्दी नसल्याने एसटी बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळत होता. दररोज गर्दीने फुलून गेलेले बस स्थानक यावेळी मात्र ओस पडल्याचे चित्र होते.