वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. असे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. लॉकडाउनमध्ये आपल्या घरी चालत निघालेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जमालो मडकाम असं या मुलीचं नाव असून कुटुबाचं पोट भरण्यासाठी ती मिरचीच्या शेतात काम करत होती. लॉकडाउन असल्याने ती आपल्या घरी चालत निघाली होती. आपल्या काही नातलगांसह तेलंगणातील पेरूर येथून छत्तीसगडमधील बिजापूर येथे निघालेल्या या चिमुरडीने ३ दिवसांत तब्बल १५० किमीचं अतंर चालत कापलं होतं. पण घरापासून 14 किलोमीटर अंतरावर असताना ती खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिर्ची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 1५ एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली. ती जवळपास १५० किलोमीटर पाई चालली. हे 12 जण 18 एप्रिलला बिजापूरमधील मोदकपाल येथे पोहोचले होते. गावापासून १४ किमी लांब असताना जमालो हिच्या पोटात प्रचंड दुखू लागलं. यामुळे ती तिथेच खाली कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला.
आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच वडील आंदोराम मडकाम आणि आई सुकमती मडकाम जिल्हा रुग्णालयात पोहोचले. मृत्यूच्या ३ दिवसांनंतर आज संबंधित मुलीचे शवविच्छेदन झाले. यानंतर तीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. त्यानंतर अखेर रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिचा मृतदेह घरी नेण्यात आला. जमालोच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, जमालोला उल्टी-जुलाब झाले, तिच्या पोटातही दुखत होते. तिच्यासोबत असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पोटभरुन जेवत नव्हती.
बिजापूर येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी.आर पुजारी यांनी सांगितले, तेलंगणाहून पाई आलेल्या मजुरांच्या गटातील एका मुलीचा मृत्यू झाला असल्याचे समजताच संबंधित मुलीचा मृतदेह बिजापूर येथे आणण्यात आला. तसेच तिच्यासोबत असलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डिहायड्रेशन आणि भुकेपोटी तिचा मृत्यू झाला आहे. “करोना चाचणी केली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिच्या शरिरातील ऊर्जा कमी झाल्याने तसंच पाण्याची पातळी कमी झाल्याने त्रास सुरु झाला असावा,” असं डॉ.पुजारी यांनी सांगितलं आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”