वृत्तसंस्था । जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. या देशात कोरोनाने निवांतपणे हातपाय पसरले आहेत. तेही इतके की जगातील सर्वात खोल असलेल्या सोन्याच्या खाणीत या चिवट कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या खाणीत काम करणाऱ्या १६४ कामगारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
‘पोनेन्ग’ ही सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातील दक्षिण-पश्चिम भागात आहे. या खाणीतील सोने काढण्याचे हक्क अँग्लोगोल्ड आशांती कंपनीला देण्यात आले आहेत. पृथ्वीतळापासून खाली ४ किमी खोल अंतरावर ही खाण आहे. जगातील सर्वात खोल खाण म्हणून या खाणीची ओळख आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोनेन्ग सोन्याच्या खाणीतील कामगार कोरोनाग्रस्त झाल्यानं या खाणीतील काम अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आले आहे.
एंग्लोगोल्ड अशांती या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात एकाला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ६५० कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी अनेकांमध्ये लक्षण दिसून आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. एक महिन्याच्या लॉकडाउनंतर मागील महिन्यातच खाण काम सुरू झाले होते. या कालावधीत सर्व सोन्याच्या खाणीदेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला कामगार संघटनांनी कोर्टात कामगार सुरक्षांबाबत दाखल केलेला खटला जिंकला होता. त्यानंतर सरकारने कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणे देण्याबाबतचे निर्देश दिले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”