औरंगाबाद – कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्जझाले असून, पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण गृह विलगीकरणात राहणार आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
कोरोना उपाययोजनांबाबत पांडेय म्हणाले, की ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना तो डोस प्राधान्याने देणे व ज्यांनी दोन्हीही डोस घेतले आहेत त्यांना तिसरा डोस देणे, याला प्राधान्य आहे. आभासी पद्धतीने कोरोनाबाधितांना वैद्यकीय सल्ला दिला जाईल. त्यांच्यावर नजर ठेवली जाईल. त्यासाठी स्वतंत्र ऑपरेशन कमांड सेंटर दोन-तीन दिवसात सुरू होईल. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घाटी रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाईल. दवाखाने, कोविड केअर सेंटर्समधील ऑक्सिजनची यंत्रणा सज्ज ठेवली जाईल. महापालिकेकडे अकरा रुग्णवाहिका आहेत, त्या सज्ज ठेवल्या जातील. कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर या ठिकाणी आवश्यक ती साधनसामुग्री अद्ययावत स्वरूपात तयार करून ठेवणे, पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेसोबत काम केले आहे, त्यांनाच पुन्हा संपर्क साधून गरजेनुसार त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाईल. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरी पाच दिवसातून एकदा जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतील, रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी समन्वयक नेमला जाईल. जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण करून घेण्याकडे लक्ष दिले जाईल. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ओमीक्रॉनचा संसर्ग होऊ न देणे हे सर्वात मोठे आव्हान असेल, असेही आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्ण, कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी शहर बसचा वापर करण्यात आला होता. यावेळी देखील गरज पडल्यास या बसचा उपयोग केला जाईल. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी कंट्रोलरुम मधून मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या माध्यमातून समुपदेशन केले जाणार आहे. खासगी दवाखान्यांनी देखील त्यांच्याशी संपर्कात असलेल्या रुग्णांना आभासी पद्धतीने मार्गदर्शन करावे, वैद्यकीय सल्ला द्यावा. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, असे आवाहन पांडेय यांनी केले.