औरंगाबाद – कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृती आराखडा तयार करून 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान ‘मिशन कवचकुंडल’ विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात महापालिकेने शहरात 20 लसीकरण केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. त्यात मिशन कवचकुंडल अभियान राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या. याविषयी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले की, या मोहिमेत ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे तिथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. महापालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आणखी 20 केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी असते, पुरेसे डॉक्टर, कर्मचारी आहेत तिथे दुप्पटीने लस दिल्या जाणार आहेत.
शहरात सध्या 45 लसीकरण केंद्रे आहेत, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. शहरात एकूण 8 लाख 76 हजार 321 नागरीकांनी लस घेतली आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 5 लाख 63 हजार 438 तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 3 लाख 12 हजार 883 एवढी आहे