सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांवर ताशेरे; एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदारांच्या अपात्रेसंबंधित आज झालेल्या सुनावणीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. “अपात्र आमदारांची सुनावणी एका आठवड्यात घ्यावी आणि न्यायालयाच्या निर्देशांचा मान ठेवावा” असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. “न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेविषयीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हतीच” असे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

आज न्यायालयात आमदारांच्या अपात्रेविषयीची सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटांनी आपापली बाजू न्यायालयापुढे मांडली. यानंतर, “आम्ही तीन महिन्यांची डेडलाईन जरी दिली नाही तर विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करावा” अशा शब्दात न्यायालयाने राहुल नार्वेकरांना सुनावले. तसेच, या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळ काढूपणा का करताय? असा सवाल देखील नार्वेकर यांना विचारण्यात आला.

एका आठवड्यात सुनावणी घ्यावी

इतकेच नव्हे तर, “आमदारांच्या अपात्रतेसंबंधित निर्देश देताना यावर पुढच्या दोन सुनावणीपूर्वी नेमकीस काय कारवाई केली याची माहिती अध्यक्षांनी द्यावी. अशा पद्धतीने अनिश्चित काळ काम करू शकत नाही, किती वेळेत काम करणार याचे टाईम टेबल विधानसभा अध्यक्षांनी द्यावे आणि एका आठवड्यात सुनावणी घ्यावी.” असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांना एका आठवड्याच्या आत आमदार अपात्रेसंबंधित सुनावणी करावी लागणार आहे.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चिन्हाबाबत आणि पक्षाच्या नावाबाबत सुनावणी पार पडली. आता ही सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, एका आठवड्याच्या आत आमदारांच्या अपात्रेबाबत सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तसेच, या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांनी उशीर केल्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.