हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत आली आहे. कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचे सांगत मुंबई दिवाणी न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे. तसेच पालिकेकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ झाली आहे.
उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.
त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. मार्च 2018 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने (BMC) तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. पण त्यानंतर ही बाब मागे पडली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’