कराड | कराड येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. कराड शहर पोलिस ठाण्यात पीडित मुलीने 30 नोव्हेंबर 2019 रोजी याबाबत फिर्यादी दाखल केली होती.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी की, पीडित मुलगी अल्पवयीन होती. संशयित आरोपी राकेश सदाशिव कांबळे (वय- 30) हा पीडित मुलीच्या घराजवळ रहात होता. घरी कोणी पुरूष नसल्याने पीडित मुलीच्या घरातील लोकांनी रोज रात्री झोपण्यासाठी त्याला बोलावले होते. आरोपी झोपण्यासाठी पीडित मुलीच्या घरी गेला असताना, त्याने दोन ते तीन वेळा फिर्यादीचे संमतीशिवाय जबरदस्तीने पीडितेच्या तोंडात रूमाल कोंबून शरीर संबंध ठेवले. सदरचा प्रकार कोणालाही न सांगण्याची तिला धमकी दिली. परिणामी पीडित मुलगी सहा महिन्याची गरोदर झाल्याने तिला स्वाधारगृह यशवंतनगर- सांगली येथे भरती केले होते. तिथे तिने बाळास जन्म दिला.
सदर खटल्याचे कामकाज जिल्हा व विशेष न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांच्या समोर झाले. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी तर्फे सहाय्यक जिल्हा व विशेष सरकारी वकील अॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. याकामी पीडित मुलीचा जबाब तसेच तपासी अधिकारी व घटनास्थळ पंच, पीडितेवर सांगली येथे केलेले उपचार व बाळाचा जन्म सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे झाला होता. तसे डीएनए चाचणी अहवाल प्राप्त होवून फिर्यादी ही जन्मलेल्या मुलाची कुमारी माता व आरोपी हा तिचा पिता असल्याचा अहवाल 31 डिसेंबर 2020 रोजी प्राप्त झाला होता. आरोपी विरूद्ध सरकार पक्षातर्फे दिलेले पुरावे ग्राहय धरून विशेष न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी पोक्सो कायद्यांतर्गत 10 वर्षे सक्त मजुरी व 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद. कलम 6 प्रमाणे 20 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद सर्व शिक्षा एकत्रीत भोगायची आहे. पीडित मुलीस दंड रक्कमेपैकी 8 हजार रूपये भरपाई म्हणून देण्यात आली आहे.
कोर्ट पैरवी म्हणून पो. कॉ. अशोक मदने, पो. कॉ. गोविंद माने व पाटील मॅडम, शिंदे मॅडम़, वाय.जी .पवार मॅडम, कॉन्स्टेबल कावेकर, संदे यांनी विशेष परिश्रम घेतले. तपासी अधिकारी एस.एस. जमदाडे व सराटे यांनी केलेला तपास तसेच विशेष सरकारी वकील अॅड. राजेंद्र शहा यांनी केलेला युक्तीवाद व विविध उच्च न्यायालयाचे निकालातील खटल्यातील दिले दाखले याचा विचार करून न्यायाधीश के.एस. होरे यांनी आरोपीस शिक्षा सुनावली आहे.