हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे H3N2 विषाणूने थैमान घातलं असतानाच महाभयंकर कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे . 4 महिन्यांनंतर अचानकच एका दिवसात कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकार सावध झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह 6 राज्याला केंद्राकडून अलर्ट करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या सहा राज्यांच्या सरकारला पत्र लिहून कोरोना संदर्भात रुग्णांच्या चाचण्या , ट्रॅक, उपचार आणि लसीकरणाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
भारतात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली होती. मात्र गेल्या काही आठवड्यात अचानक रुग्णसंख्येत वाढ होतं दिसत आहे. 8 मार्च रोजी कोरोनाची एकूण 2,082 प्रकरणे नोंदवण्यात आली होती तर 15 मार्च रोजी हाच आकडा 3,264 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार, महाराष्ट्रात एका दिवसात 176 नवीन कोरोनाव्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोणाचाही यामुळे मृत्यू झालेला नाही.
एकीकडे कोरोनाने पुन्हा एका डोकं वर काढलं असतानाच H3N2 विषाणूच्या रुग्णातही वाढ सुरूच आहे. H3N2 हा इन्फ्लूएंझा ए व्हायरसचा उपप्रकार आहे. ताप किंवा तीव्र सर्दी, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, मळमळ, डोकेदुखी अशी या विषाणूची लक्षणे आहेत. महाराष्टात H3N2 चे अनेक रुग्ण असून आत्तापर्यंत 3 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.