हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे.
पुण्यात नवीन 136 रूग्ण आढळले आहेत, तर एकूण कोरोना रुग्णसंख्या 510 झाली आहे. पुण्यापाठोपाठ मुंबई आणि ठाण्याचा नंबर लागतो. दुसरीकडे कोरोनासोबतच इन्फ्लूएंझा संसर्गही राज्यात झपाट्याने वाढत आहे. ठाण्यात गुरुवारी एका वृद्धाचा H3N2 मुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात 1 जानेवारी 2023 ते 20 मार्च 2023 पर्यंत महाराष्ट्रात H3N2 चे 217 आणि H1N1 चे 407 रुग्ण आढळून आलेले आहेत.
सध्या संपूर्ण देशात कोरोना आणि H3N2 चे संकट आहे. त्यातही महाराष्ट्रसह गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या सहा राज्यांच्या सरकारला पत्र लिहून कोरोना संदर्भात रुग्णांच्या चाचण्या , ट्रॅक, उपचार आणि लसीकरणाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.