लॉकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयन्त पुरेसे नाहीत- अभिजित बॅनर्जी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या गरीबांसाठी भारत सरकारने पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकारला गरीबांसाठी आणखी बरंच काही करण्याची गरज असल्याचं म्हटलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडून गरीबांच्या खात्यात थेट अर्थसहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन देणे असे उपाय केले होते. पण हे पुरेसं नसल्याचं अभिजित बॅनर्जी म्हणाले.

अभिजित बॅनर्जी यांच्या मते, भारत सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जो योग्य आहे, पण लॉकडाऊनमुळे हे संपणार नाही. लस येत नाही तोपर्यंत हा रोग आपली साथ सोडणार नाही आणि लस लवकर येईल असं दिसत नाही, असं ते म्हणाले. भारत सरकारला सध्या स्पष्टपणे विचार करण्याची गरज आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत ग्राहक मागणी अगोदरच कमी झाली होती आणि कोरोनाच्या संकटामुळे ही मागणी आणखी घटली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या कमाईची साधने बंद झाली आहेत. या काळात कमाईचं साधन नसलेल्या गरीब लोकांसाठी सरकारने आणखी उदारमतवादी दृष्टीकोन अवलंबणं आवश्यक आहे’, असं अभिजित बॅनर्जी म्हणाले.

‘बाजारपेठच बंद असताना लोकांना पैसा देऊन काय करणार असंही बोललं जात असल्याची मला कल्पना आहे. पण कशाने तरी सुरुवात करायची आहे. कुठून तरी पैसा येतोय हे सांगून तुम्ही लोकांची खर्च करण्याची मानसिकता तयार करू शकता. लोकांना शाश्वतीची गरज आहे आणि सरकारने ही शाश्वती देण्यासाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या हातात पैसा असण्याची गरज आहे. जेणेकरुन जेव्हा बाजारपेठ खुली होईल तेव्हा ते पैसा खर्च करू शकतील, अशी गरज बॅनर्जी यांनी बोलून दाखवली. केंद्र सरकारच्या योजनेसाठी अगोदरच पात्र असलेल्या लोकांना हा लाभ दिला जाऊ शकतो’, असंही बॅनर्जी म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची काळजी घेत आता अर्थव्यवस्था खुली करण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. त्यातच अनेक स्थलांतरित कामगार त्यांच्या कामाचं स्थळ सोडून गावी परतले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन मागे घेताच पूर्ण ताकदीने काम कसं सुरू करायचं आणि पुरवठा साखळी कशी सुरळीत करायची हे आव्हान सरकारसमोर असेल. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि लोकांची खर्चाची क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येकाकडे पुरेसा पैसा असणं गरजेचं आहे. पण आपण या घडीला काहीही करत असल्याचं दिसत नाही. ही आणीबाणी आहे. कल्याणकारी लाभ देण्यासाठी नोटांची छपाई करण्यासही भारत सरकारने घाबरू नये’, असंही अभिजित बॅनर्जी म्हणाले. चलन छपाई करुन नागरिकांची गरज पूर्ण करण्याचा दृष्टीकोन अमेरिकेने अवलंबला आहे. मग भारताने हे का करायला नको? असा सवालही अभिजित बॅनर्जी यांनी उपस्थित केला. वस्तू आणि सेवांचा पुरेसा साठा नसल्यामुळे महागाईची भीती असेल. पण हा जो खंड पडला आहे तो भरुन काढण्यासाठी भारत सरकारला काही तरी करण्याची आवश्यकता आहे. पैसे खर्च करण्याबाबत सरकारने आक्रमकपणे पाऊल उचलण्याची गरज असल्याचे बॅनर्जी यांनी म्हटलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”

Leave a Comment