गेल्या २४ तासांत भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ; देशभरात ७५,७६० नवे रुग्ण सापडले

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहेत. अशा वेळी गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल ७५,७६० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १०२३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबिधांची संख्या ३३ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ७,२५,९९१ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत २५,२३,७७२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाने ६०,४७२ लोकांचा जीव घेतला आहे. तसेच २६ ऑगस्टपर्यंत देशभरात ३,८५,७६,५१० कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी ९ लाख २४ हजार ९९८ नमून्यांची काल(बुधवारी)तपासणी झाली, अशी माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले राज्य आहे. बुधवारी राज्यात कोरोनाच्या सर्वाधिक १४,८८८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७,१८,७११ इतकी झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या २३०८९ इतकी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आज ७२.६९ टक्के झालं असून मृत्यूदर ३.२१ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ३७,९४,०२७ जणांची कोरोना टेस्ट झाली असून त्यातील ७,१८,७११ (१८.९४ टक्के ) जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”