मुंबई । देशात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही आहे. त्यातच आता लॉकडाऊनचा चौथा टप्पाही संपुष्टात येतो आहे. त्यामुळे, देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. अशा वेळी केंद्रीय गृह मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काही प्रसार माध्यम संस्थांकडून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. प्रसार माध्यमातून केले जाणारे लॉकडाऊन ५.० बद्दलचे सर्व दावे खोटे असल्याचं स्पष्टीकरणं गृह मंत्रालयानं दिलं आहे.
येत्या ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ते लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल घोषणा करू शकतील, असा प्रसार माध्यमांचा कयास आहे. गृह मंत्रालयानं हा दावा आधारहीन असल्याचं सांगितलं आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. २५ मार्चपासून सुरू झालेलं हे लॉकडाऊन आतापर्यंत ४ टप्प्यांत वाढवण्यात आलं. १८ मेपासून सुरू झालेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान, एका प्रसार माध्यम संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ३१ मे रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबद्दल घोषणा होऊ शकते, असं म्हटलं आहे. यावर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्थिती स्पष्ट करतानाच मीडियाचे या दाव्यांना कोणताही अर्थ नसल्यांचं म्हटलं आहे. या दाव्यांना गृह मंत्रालयाशी जोडणंही योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कारण लॉकडाऊनची संपूर्ण रुपरेषा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) द्वारे तयार केली जाते असं स्पष्टीकरणही गृह मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”