जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज बॅट्समन एबी डीव्हिलियर्स पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी यासंबंधित संकेत दिले होते. तसेच आयपीएल स्पर्धेदरम्यान डीव्हिलियर्सनेसुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाबाबत दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध जून महिन्यात होणाऱ्या टी-20 मालिकेतुन डीव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेची टीम जून महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये त्यांच्यात 2 टेस्ट आणि 5 टी 20 मॅचच्या मालिका होणार आहेत. अशी घोषणा स्मिथ यांनी केली आहे. तसेच त्यांनी एबी डीव्हिलियर्स पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल असे मत व्यक्त केले आहे. डीव्हिलियर्ससोबत ख्रिस मॉरीस आणि इम्रान ताहीरसुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. डीव्हिलियर्स, मॉरीस आणि ताहीरचे टीममध्ये पुनरागमन होईल, अशी आपल्याला आशा आहे, असे मत ग्रॅमी स्मिथ यांनी व्यक्त केले आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही. ग्रॅमी स्मिथ यांच्या वक्तव्यामुळे डीव्हिलियर्सच्या पुनरागमनाची आता केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी आहे असे मानले जात आहे.
डीव्हिलियर्सने ३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 114 टेस्टमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीनं 8765 रन केले आहेत. यामध्ये 22 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 228 वन-डेमध्ये 53 पेक्षा जास्त सरासरीने 8765 रन केले आहेत. यामध्ये 22 शतक आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. तर त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 1762 रन केले आहेत. एबी डीव्हिलियर्सची ‘मिस्टर 360’ म्हणून संपूर्ण क्रिकेट विश्वात ओळख आहे. जर एबी डीव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले तर येणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा फायदा होणार आहे.