लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या नव्या क्रिकेट सिझनला लवकरच सुरुवात होणार आहे. या सिझनमध्ये इंग्लंड सर्वप्रथम न्यूझीलंड विरुद्ध 2 टेस्ट मॅचची सिरीज खेळणार आहे. यानंतर ते टीम इंडियाविरुद्ध पाच टेस्टची मालिका खेळणार आहे. या मालिकांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने टीमला एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने आपल्या सल्ल्यात इंग्लंडने कोणत्याही परिस्थितीमध्ये रविंद्र जडेजासारखा खेळाडू शोधला पाहिजे. तसेच तरुण खेळाडूंनी त्याच्या सारखं होण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला आहे.
काय म्हणाला केव्हिन पीटरसन
“इंग्लंडची टीम आजवर बॅटींग करु शकणाऱ्या डावखुरा स्पिन बॉलरला शोधू शकलेली नाही. इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा रविंद्र जडेजा शोधायला हवा. जडेजाने टेस्ट, वन-डे आणि टी 20 मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंडला या प्रश्नावर उत्तर शोधलंच पाहिजे. त्यांना जडेजासारखा खेळाडू मिळाला तर त्यापेक्षा अनमोल काहीही नसेल.’ असे केव्हिन पीटरसन याने सांगितले आहे.
तरुण खेळाडूंनी नक्कल करावी
केव्हिन पीटरसनने युवा खेळाडूंना मोलाचा सल्ला देत जडेजाचा खेळ पाहून शिकण्याचा सल्ला दिला आहे. ‘जडेजाची नक्कल करा. तो एक सुपरस्टार आहे. तुम्ही तसे केले तर इंग्लडचा टेस्ट क्रिकेटपटू म्हणून तुमची कारकिर्द मोठी असेल.’ असे पीटरसन म्हणाला आहे. पीटरसनने जॅक लीच आणि डोम बीच या इंग्लंडच्या दोन स्पिनरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘लीच टेस्ट मॅच जिंकू शकत नाही हे मी दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते. तसेच हे खरेदेखील ठरले आहे. तो ग्रॅमी स्वान किंवा माँटी पानेसर यांच्यासारखा नाही आहे. इंग्लंडने लवकरात लवकर डावखुरा स्पिन बॉलर शोधला पाहिजे नाही तर ही टीमची कमकुवत बाजू असेल,’ असे केव्हिन पीटरसनने स्पष्ट केले आहे.