लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने सरे या या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विनने पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली. असे असले तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन आणि इंग्लंडचा ओपनिंग बॅट्समन रोरी बर्न्सने अश्विनला दोन्ही बाजूने बॉलिंग दिली. यावेळी त्याने एका रेकॉर्डची नोंद केली आहे. मागच्या 11 वर्षात इनिंगमधील पहिली ओव्हर टाकाणारा अश्विन हा पहिला स्पिनर बनला आहे. यापूर्वी 2010 साली जतीन पटेलने हि कामगिरी केली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी इंग्लंडमध्ये सराव न केल्याचा फटका टीम इंडियाला बसला होता. अश्विनने पराभवानंतर हि गोष्ट मान्य केली होती. ही चूक सुधारण्यासाठी तो आतापासूनच कामाला लागला आहे. अश्विन खेळत असलेला हा सामना ‘द ओव्हल’ या मैदानावर सुरु आहे. याच मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट होणार आहे. त्यामुळे अश्विनला सरेकडून मिळालेल्या संधीचा टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा दुसरा सिझन भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या टेस्ट सीरिजपासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर मागील काही इंग्लंड दौऱ्यात पराभव झाल्यामुळे टीम इंडियासाठी हि सिरीज जिंकणे खूप महत्वाचे असणार आहे. या सीरिजपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना 20 दिवसांचा ब्रेक देण्यात आला आहे. अश्विनने या ब्रेकमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी सरे टीमबरोबर एका मॅचचा करार केला आहे.