हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत आहे. वर्ल्ड कप २०१९ पासून धोनी भारतासाठी कोणताही सामना खेळलेला नाही, ज्यामुळे बीसीसीआयने त्याला आपल्या वार्षिक करारामधून वगळले आहे. अनेक दिग्गजांचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणे हे धोनीसाठी आता अवघड आहे, मात्र भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन ज्याच्या नेतृत्वात भारताने २८ वर्षानंतर २०११ मध्ये विश्वचषक जिंकला होता, त्याचे असे म्हणणे आहे की, धोनीने आपल्या अटींवर हा खेळ सोडण्याचा अधिकार मिळविला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गॅरी कर्स्टनने धोनीविषयी बोलताना सांगितले की “एमएस धोनी हा एक अविश्वसनीय क्रिकेटपटू आहे. त्याची बुद्धिमत्ता, शांतता, ताकद, अॅथलेटिक्स, वेग आणि एक मॅच विनर हे गुण त्याला इतरांपेक्षा वेगळा खेळाडू बनवितात आणि म्हणूनच तो या आधुनिक युगातील सर्वात महान खेळाडूंमध्ये गणला जातोय. “
गॅरी पुढे म्हणाला, “त्याने स्वत: च्या अटीनुसार हा खेळ सोडण्याचा अधिकार मिळविला आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा कोणीही त्याविषयी बोलू नये.”
२०११ च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने श्रीलंकेला अंतिम सामन्यात ६ गडी राखून पराभूत केले. यासह २८ वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने विश्वचषक जिंकला. या वर्ल्ड कपच्या प्रवासाविषयी बोलताना गॅरी म्हणाला, ” भारतीय खेळाडूंसमवेतचा माझा हा एक चांगला प्रवास होता तसेच या वर्ल्ड कपच्या काही चांगल्या आठवणीही माझ्याकडे आहेत. विश्वकरंडक जिंकण्याची खेळाडूंकडून बरीच अपेक्षा होती आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे हाताळले. ”
गॅरीने दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात मिळून १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत, पण कोचिंगपेक्षा क्रिकेट खेळणे हे अधिक आव्हानात्मक आहे असे त्याला वाटते. गॅरी म्हणाला, ” क्रिकेट खेळणे अधिक आव्हानात्मक होते. मला भारतीय संघाचा प्रशिक्षक होणे आवडत होते. माझ्या आयुष्यातील हा एक मोठा विशेषाधिकार होता.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.