हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्यकाळातील योजनेबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. आयसीसी या बैठकीत पुढील चेअरमन पदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराने ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी होणार्या टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत मंडळाचे सदस्य एखांदा ठोस निर्णय घेऊ शकतात.
अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) २०२१ ऐवजी २०२२ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याचे आयोजन करण्यास सहमती देणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयला सांगितले की, “पहिले आयसीसीला यावर्षीच्या वर्ल्ड टी -२० बाबतचा त्यांचा हेतू काय ते जाहीर करू द्या. यावर्षीच्या स्पर्धेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक अशी घोषणा झालेली नाही आहे.”
आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिका-याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “भारत एकतर पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलिया च्या आग्रहाने २०२१ मध्ये स्पर्धा आयोजित करेल किंवा २०२२ मध्ये करेल. मात्र काहीही झाले तरी द्विपक्षीय मालिका लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल. “
दुसरा पैलू म्हणजे स्टार इंडिया, ज्याने आयपीएल आणि आयसीसी स्पर्धांमध्येही आपली गुंतवणूक केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की,“स्टार हा एक भागधारक देखील आहे. त्यांचे मतही महत्त्वाचे ठरेल. टी -२० विश्वचषक पुढे ढकलल्यास किंवा रद्द केल्यास इंडियन प्रीमियर लीग ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, अशीही एक शक्यता आहे.
आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि मंडळ त्यांच्या वारसदारांसाठी नामांकन प्रक्रियेची औपचारिक घोषणा करणार की नाही ही आणखी एक महत्त्वाची बाब असेल. या पदासाठी अनेक दावेदार आहेत. महिनाभरापूर्वीपर्यंत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) कॉलिन ग्रेव्हस यांची एकमताने निवड झाल्यासारखे दिसत होते आणि आताही तेच मुख्य दावेदार आहेत. मात्र आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एहसान मनी यांचीही नावे या पदासाठी रिंगणात आहेत. ज्यामुळे हे प्रकरण रंजक बनले आहे.
बीसीसीआयने अद्याप गांगुलीला उमेदवारी देण्याचा औपचारिक निर्णय घेतलेला नाहीये. धुमाळ म्हणाले, ” यात घाई काय आहे?” ते पहिले निवडणूक प्रक्रिया घोषित करतील. यासाठी वेळ मर्यादा असेल. आम्ही योग्य वेळी याबाबत निर्णय घेऊ. “
आणखी एक मुद्दा म्हणजे भारतातील २०२१ टी -२० विश्वचषक करमुक्तीशी संबंधित आहे. बीसीसीआय आधीपासूनच भारतात २०१६ मध्ये खेळवल्या गेलेल्या टी -२० वर्ल्डकपशी संबंधित करांबाबत लढाई लढत आहे. यासाठी देय असलेल्या दोन कोटी ३७ लाख डॉलर्सचा मुद्दा अजूनही विवाद निराकरण समिती खाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.