नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगड टीमचा कॅप्टन आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज मनन व्होरा याचा मागचा आठवडा खूप वेदनकदायक होता. मनन व्होरा याच्या आई-वडिल आणि आजोबा यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना पंचकुलामधील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. मनन व्होरा याच्या आईवडिलांनी कोरोनावर मात करत हि लढाई जिंकली आहे. पण दुर्दैवाने त्याच्या आजोबांचे निधन झाले ते ९२ वर्षांचे होते.
माजी हॉकीपटू होते आजोबा
मनन व्होराच्या आजोबांचे नाव यशपाल व्होरा आहे. ते राष्ट्रीय हॉकीपटू होते. बलबिर सिंग (सिनियर), धरम सिंग, बक्षीस सिंग या सारख्या ज्येष्ठ हॉकीपटूंसोबत त्यांनी १९५० च्या दशकात भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केले होते. १९५६ मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांची भारताच्या संभाव्य खेळाडूंमध्ये निवड झाली होती मात्र त्यांना दुखापत झाल्याने त्यांना हि संधी मिळू शकली नाही. ते चंदीगड हॉकी आणि चंदीगड ऑलिम्पिक असोसिएशनचे २५ वर्ष प्रशासक होते.
मननची कारकीर्द
मनन व्होरा हा २०१२ साली अंडर १९ वर्ल्ड कप जिंकलेल्या टीमचा सदस्य होता. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (PBKS), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या टीमकडून खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. मनन व्होराने आतापर्यंत ५३ आयपीएलचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १०५४ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.