वेलिंग्टन : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या चॅम्पियनशीपच्या फायनलकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही टीमने जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या 12 वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या विकेटकिपर – बॅट्समनसाठी ही फायनल शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असणार आहे. ह्या न्यूझीलंडच्या विकेट-किपर बॅट्समनचे नाव ब्रॅडले वॉटलिंग आहे. ब्रॅडले वॉटलिंग याने या फायनलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.
ब्रॅडले वॉटलिंगची कारकीर्द
ब्रॅडले वॉटलिंगने 2009 मध्ये न्यूझीलंडकडून पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकिर्दीत विकेट-किपर म्हणून 249 कॅच घेतल्या आहेत. ब्रॅडले वॉटलिंग हा न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला विकेटकिपर-बॅट्समन आहे. त्याने 73 टेस्ट मॅचमध्ये 38.11 च्या सरासरीनं 3773 रन केले आहेत. यामध्ये 8 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ब्रॅडले वॉटलिंगने न्यूझीलंडकडून 5 टी- 20 आणि 28 वन-डे मॅचसुद्धा खेळल्या आहेत.
विल्यमसनचा सर्वात विश्वासू
ब्रॅडले वॉटलिंग हा न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनचा सर्वात विश्वासू खेळाडू आहे. एकदा केन विल्यमसनला तुझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही कोणत्या खेळाडूची निवड करताल असे विचारले असता त्याने ब्रॅडले वॉटलिंग याचे नाव घेतले. वॉटलिंगचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दरबन या ठिकाणी झाला आहे. त्यानंतर तो 10 वर्षांचा असताना त्याचे सर्व कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते. 2008 मध्ये ब्रॅडले वॉटलिंगने हॅमिल्टवमधील एका क्लबकडून 378 रनची विशाल खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.