हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत क्रिकेटमधील जवळपास सर्व विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनची असे अनेक विक्रम आहेत जे मोडणेही शक्य नाहीत. सचिनने डोंगराएवढ्या धावा करून आंतरराष्ट्रीय वनडे तसेच कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत.
सचिनने २५ वर्षांपूर्वी असाच एक विक्रम केला होता. या दिवशी सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. १९९५ मध्ये शारजाह येथे खेळल्या गेलेल्या एशिया कप सामन्यादरम्यान श्रीलंकेविरूद्ध फलंदाजी करताना सचिनने हा पराक्रम केला होता. यावेळी सचिन फक्त २२ वर्षांचा होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ६ विकेट गमावून २०२ धावा केल्या. श्रीलंकेकडून हसन तिलकरत्नेने ४८ धावा केल्या होत्या.या सामन्यात वेंकटेश प्रसादने भारताकडून सर्वाधिक तीन गडी बाद केले तर जवागल श्रीनाथने दोन विकेट घेतलेले. त्याचवेळी मनोज प्रभाकर आणि अनिल कुंबळे यांनीही एक एक विकेट घेतली होती.श्रीलंकेच्या २०२ धावांच्या लक्ष्यला उत्तर देताना भारतीय संघासाठी सलामीवीर सचिन आणि मनोज प्रभाकर यांनी दमदार सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी १६१ धावांची शतकी भागीदारी केली.
प्रभाकरने ६० धावा केल्या तर सचिनने शतकी खेळी करताना डाव पुढे सरकवला. सचिनने ११२ धावा केल्या ज्यामध्ये त्याने १५ चौकार आणि १ षटकार लगावला.या सामन्यात भारताने श्रीलंकेला ८ गडी राखून पराभूत केले.सचिनने केलेल्या अनेक उत्कृष्ट खेळींपैकी हि एक खेळी होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.