रविवारी पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौर्‍यावर जाण्यासाठी तयार, हाफिजसह 6 खेळाडूंच्या टेस्ट निगेटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शनिवारी सांगितले की, रविवारी पाकिस्तानचे 20 खेळाडू आणि 11 स्पोर्ट स्टाफ हे इंग्लंड दौर्‍यावर रवाना होतील. या आठवड्याच्या सुरूवातीला कोरोनामुळे संक्रमित झालेल्या 10 पाकिस्तानी खेळाडूंपैकी अनुभवी अष्टपैलू मोहम्मद हाफिजसह 6 पाकिस्तानी खेळाडूंची दुसरी कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आल्याचे पीसीबीने स्पष्ट केले.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने सांगितले की, रविवारी संघ मँचेस्टरला रवाना होईल. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी पत्रकारांना सांगितले की, वेगवान गोलंदाज मूसा खान आणि यष्टिरक्षक-फलंदाज रोहेल नजीर हे राखीवमध्ये असलेले खेळाडू यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि आता ते रविवारी संघासह दौऱ्यावर निघतील.

ज्या 10 खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली होती, त्यांच्या सलग दोन टेस्ट निगेटिव्ह आल्या नंतरच इंग्लंडला पाठवले जाईल, असेही खान यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला झालेल्या कोरोना टेस्ट मध्ये 10 पाकिस्तानी खेळाडू हे पॉझिटिव्ह ठरले होते, तर फखर जमान, मोहम्मद हसनैन, मोहम्मद हफीझ, मोहम्मद रिझवान, शादाब खान आणि वहाब रियाज यांच्या कोरोनाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. त्याचबरोबर हैदर अली, हॅरीस रऊफ, काशिफ भट्टी आणि इम्रान खान यांच्या टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.

खान यांनी पुन्हा सांगितले की, ज्या सहा खेळाडूंची टेस्ट आता निगेटिव्ह आली आहे त्यांची पुढील आठवड्यात पुन्हा तिसरी टेस्ट करण्यात येईल आणि जर हे सर्व निगेटिव्ह ठरले तरच पीसीबी त्यांना इंग्लंडला पाठवण्याची व्यवस्था करेल. ते म्हणाले, “मला माहिती आहे की पीसीबीच्या तपासणीपूर्वीच मोहम्मद हाफिज आणि वहाब रियाज यांनी बाहेरून स्वत:ची टेस्ट केली आहे आणि त्याचा रिझल्टही निगेटिव्ह आला आहे. पीसीबीच्या धोरणानुसार, त्यांना पीसीबीच्या तपासणी प्रक्रियेमध्ये दोनदा निगेटिव्ह यावे लागेल. “

“अशा परिस्थितीत पीसीबीच्या चाचणी कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा त्यांच्या तपासणीचे निकाल हे निगेटिव्ह ठरल्यास ते इंग्लंडला जाणाऱ्या संघात सामील होण्यास तयार असतील,” असे ते म्हणाले. पाकिस्तानची टीम इंग्लंडला पोहोचल्यानंतर खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन ठेवले जाईल.

रविवारी, 28 जून रोजी इंग्लंडला रवाना झालेल्या खेळाडूंची नावे अशी: अझर अली (कर्णधार), बाबर आझम (उपकर्णधार), आबिद अली, असद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, इमाम- उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मुसा खान, नसीम शाह, रोहेल नजीर, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिन्वारी आणि यासिर शाह.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.