जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. विवेकला मागच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला कॅन्सर देखील होता.
सध्या कोरोनाच्या महामारीमुळे यंदाची आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विवेकच्या मित्रांनी आणि सहकारी क्रिकेटपटूंनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. विवेक यादव याच्या निधनावर राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सुद्धा शोक व्यक्त केला आहे.
या अगोदर राजस्थान क्रिकेटमध्ये टायगर या नावावे प्रसिद्ध असलेले किशन रुंगठा यांचे देखील वयाच्या ८९व्या वर्षी कोरोनाने निधन झाले आहे. ते राष्ट्रीय निवड समितीचे माजी सदस्य व राजस्थान रणजी टीमचे माजी कॅप्टन होते. आयपीएलमध्ये विवेक यादव हा २०१२ रोजी दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचा सदस्य होता.