नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये मुसंडी मारली. साखळी सामन्यात दिमाखदार कामगीरी करणारा भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गर्भगळीत का झाला याचे उत्तर भल्या भल्यांना देता आले नाही. तर भारतीय संघाचे हे अधोगतीचे रूप पाहून भारतातील क्रिकेट रसिकांना हृदय विकाराचे झटके आले. सबब या पराभवाला भारतीय संघात उफाळलेली गटबाजी कारणीभूत आहे अशी चर्चा आता दबक्या आवाजात केली जात आहे. त्याच प्रमाणे भारतीय क्रिकेट टीमचे कोच रवी शास्त्रीच या पराभवाला जबाबदार आहेत असे देखील बोलले जाते आहे. त्यामुळे त्यांची लवकरच उचल बांगडी होण्याची शक्यता आहे.
क्रिकेट जगतातील जाणकारांनी या सामन्याच्या पराभवाला कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांना दोषी धरले आहे. तर साखळी फेरीत एवढा विक्रमी खेळी करणारा भारत आकस्मितपणे सेमीफायनल मध्ये पराभूत कसा झाला. याला भारतीय संघात पडलेले दोन गटच जबाबदार आहेत. तसेच आता हे दोन्ही गट एकमेकांचे उट्टे काढू लागले आहेत. त्यामुळे टीम इंडियामध्ये येत्या काळात मोठे बदल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
विराट कोहली याच्या गटात असणाऱ्या खेळाडूची कामगिरी कितीही खराब असली तरी त्यांना संघात स्थान मिळते. मात्र रोहित शर्मा याच्या गटाच्या खेळाडूने कितीही चांगली कामगिरी केली तरी देखील त्यांना टीम मधून बाहेर ठेवले जाते. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना संघातून बाहेर ठेवले जाते तर केएल राहुलने कितीही खराब कामगिरी केली तरी त्याला संघात कायम ठेवले जाते कारण तो विराट कोहलीचा जवळचा आहे. अशा गटबाजीने बरबटलेल्या टीमला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. त्याला अंतर्गत माजलेली गटबाजीच कारणीभूत आहे असे मत क्रिकेट विश्वातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.