मुंबई | रयत शिक्षण संस्थेवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक ट्विटरवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मंत्री आव्हाड यांनी आ. शिंदे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये गाैरीशंकर संस्थेचा उल्लेख करत शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते असे मंत्री आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ टाक आमदार शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शरद पवारांवर वैयक्तिक टीका करताना काहीजण आपण खूप कर्तृत्ववान आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. एकतर अशा बातम्यांनी टीव्हीवर चमकायला मिळत आणि वृत्तपत्रांमध्येही नाव यायला सुरूवात होते. कुठल्या गावातला कोण, महेश शिंदे? त्यांची गौरीशंकर नावाची शिक्षणसंस्था आहे. त्यांचे मावसभाऊ कि मामेभाऊ आहेत मदन जगताप, यांच्यासोबत 50 टक्के पार्टनरशिप आहे. काय चाललंय या शिक्षणसंस्थेत? स्टाफचा पगार नाही, प्राध्यापकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फीचा आतापता नाही. शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते,’ अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
साहेबान वर टीका सहन केली जाणार नाही pic.twitter.com/CHygbbAgBL
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 11, 2022
‘तुम्ही शरद पवारसाहेबांच्या उंचीपेक्षा दोन इंच छोटे असल्याचे वक्तव्य केलं आहे. पण पवारसाहेब त्यांच्या कर्तृत्वाच्या उंचीने ओळखले जातात. रयत शिक्षणसंस्था ज्या उद्देशाने बनवली होती, बहुजनांच्या उद्देशासाठी, त्याचा ज्या पध्दतीने गावागावात पाळेमुळे पसरली, त्यामध्ये फक्त पवारसाहेब होते. त्यामुळे आपण ज्या माणसाबद्दल बोलतो आहोत, त्याच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा. बोलायला तुम्ही कितीही बोलू शकता. पण स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका. तुम्ही उंचीने किती आहात, हा प्रश्न नाही. तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढा तपासून पाहिले तर बरं होईल,’ अशा खरमरीत शब्दांत आव्हाडांनी शिंदेंवर निशाणा साधला.