महत्वाची बातमी : पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरु

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक सध्या सुरु आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी लागू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित आहेत.

या बैठकीत लॉकडाऊनबाबत अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. ‘पुण्यात लॉकडाऊन करू नये, अशी सर्व लोकप्रतिनिधींची मागणी आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात येणार आहेत,’ अशी भूमिका अजित पवार यांनी या बैठकीत घेतल्याची माहिती समोर येत आहे. राज्यभरात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने राज्यभरात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता पुण्यात निर्बंध आणखी कडक करण्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यावर चर्चा सुरू आहे. मात्र असा निर्णय झाल्यास पुणेकरांना संध्याकाळी 6 नंतर अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर पडता येणार नाही.

पुण्यात गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असली तर लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.

You might also like