पाटण | ऊस वाहतूक करणार्या रिकाम्या ट्रॉल्या वेगळ्या करण्याकरिता मदतीसाठी गेलेले उंब्रज (ता. कराड) येथील मेडिकल व्यावसायिकाचा दोन्ही ट्रॉल्यांच्या मध्ये सापडून दुर्दैवी अंत झाला. बहुले (ता. पाटण) येथे शनिवारी ही घटना घडली असून युवकाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विकास पांडुरंग काळे (वय- 38 रा. उंब्रज ता. कराड) असे मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे. विकास काळे याचा मेडिकल व्यवसाय असून बहुले (ता.पाटण) येथे त्याचे अनेक वर्षापासून मेडिकलचे दुकान आहे. शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास विकास काळे मेडिकलमध्ये बसला होता. मेडिकल समोरील मोकळ्या जागेत ऊस वाहतूक करणार्या दोन रिकाम्या ट्रॉल्या उभ्या होत्या.
त्या दोन ट्रॉल्या वेगळ्या करण्यासाठी विकास यास मदतीसाठी बोलवण्यात आले होते. विकास याने त्या ठिकाणी जाऊन ट्रॉलीला लावण्यात आलेली पीन काढली असता ट्रॉली पुढे सरकली. दोन ट्रॉल्यांच्या मध्ये विकास हा जोराने दाबला गेल्याने त्याचा जागेवरच अंत झाला. विकास हा मनमिळावू स्वभावाचा व दुसर्याच्या मदतीला धावून जाणारा म्हणून बहुले परिसरात परिचित आहे. त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.’