अजित पवार गटातील मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी!! लोह खाणीतील उत्खननाला नक्षलवाद्यांचा विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या वर्षभरात आत्राम यांना आलेली ही तिसरी धमकी आहे. या धमकीमुळे पुन्हा राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोखंडाच्या खाणीवरून आत्राम यांना ही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी आत्राम यांना एक पत्र मिळाले त्या पत्रात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधून सर्व घटनेची माहिती दिली आहे. आता हे पत्र कोणी पाठवले याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

पत्राद्वारे धमकी

धर्मरावबाबा आत्राम यांना मिळालेल्या पत्रात धमकी देण्यात आली आहे की, सूरजागड येथे लोह खाणीत खनिजांचे उत्खनन सुरु आहे. जर हे उत्खनन लवकर थांबवण्यात आले नाही तर त्याची किंमत आत्राम यांना मोजावी लागेल. या पत्रात आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर, भाऊ जयराज हलगेकर आणि कंपनीत काम करणारे भोलू सोमनानी, संजय चांगलानी यांची देखील नावे लिहण्यात आली आहेत. या पत्रामुळेच आत्राम यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नक्षलवाद्यांकडून तिसरी धमकी

साध्य गडचिरोलीच्या जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोखंडाच्या खाणीतील खनिज उत्खननाचे काम सुरू आहे. परंतु या उत्खननाला नक्षलवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे हे काम थांबवण्यात यावे यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी देखील हिवाळी अधिवेशनादरम्यान याच प्रकरणी नक्षलवाद्यांकडून आत्राम यांना धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर आता त्यांना ही तिसरी धमकी मिळाली आहे.

झेड प्लस सुरक्षा अद्याप पुरवली नाही

धर्मराव बाबा आत्राम यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही सरकारकडून त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता तिसऱ्या धमकीनंतर तरी सरकार आता मी यांना तातडीने सुरक्षा देईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.